(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
मावस बहिणीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी नाणीज येथे गेलेल्या २८ वर्षीय तरुणाचा परतीच्या प्रवासादरम्यान प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला. आई-वडिलांसोबत रिक्षाने देवरुखकडे येत असताना नाणीज येथील जना मठ परिसरात त्याला उलटीसारखे होऊन अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. विनायक हरिश्चंद्र जाधव (वय २८, रा. तुळसणी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनायक जाधव हे आई-वडिलांसोबत नाणीज येथे त्यांच्या मावस बहिणीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आई-वडिलांसह रिक्षाने देवरुखकडे परतत होते. नाणीज येथील जना मठ परिसरात आले असता विनायक यांना उलटीसारखे होऊन अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांनी तातडीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, देवरुख येथे दाखल केले. मात्र, तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४९/२०२६ नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.


