(रत्नागिरी /प्रतिनिधी)
घरातील बेडरूममधील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना रत्नागिरीतील कोकणनगर येथे उघडकीस आली आहे. लॉकरची चावी त्याच ठिकाणी मिळाल्याने चोरट्याने चावीनेच लॉकर उघडून तब्बल ४ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकणनगर येथील प्रज्ञा हॉस्पिटलजवळ राहणारे नझीर अब्दुल्ला वणू (वय ६२) यांच्या राहत्या घरात ही चोरी झाली. १५ सप्टेंबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नेमकी तारीख व वेळ माहीत नसताना अज्ञात व्यक्तीने घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटाच्या लॉकरची चावी त्याच ठिकाणी मिळवून लॉकर उघडले. त्यानंतर लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने चोरून नेली.
चोरट्याने २२ हजार रुपयांची रोख रक्कम, ४ तोळे वजनाचा सोन्याचा हार (१ लाख २० हजार रुपये), साडेतीन तोळ्याचा रोडियम सोन्याचा हार (१ लाख १० हजार रुपये), १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (४० हजार रुपये), साडेतीन तोळ्याचे दोन सोन्याचे कडे (१ लाख रुपये), कानातील चार सोन्याची कर्णफुले व दोन सोन्याच्या रिंगा (६० हजार रुपये), २ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या छोट्या रिंगा (१० हजार रुपये) आणि २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन (१० हजार रुपये), असा एकूण ४ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
या प्रकरणी नझीर अब्दुल्ला वणू यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.


