(मुंबई)
मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात सोमवारी रात्री एका तरुणावर मित्रांनी ज्वलनशील पदार्थ फेकून आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोहिनूर सिटी इमारतीत राहणाऱ्या अब्दुल रहमानच्या 21 व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन पाच मित्रांनी क्रूर पद्धतीने केले. या घटनेत आरोपींच्या यादीत अयाज़ मलिक, अशरफ़ मलिक, कासिम चौधरी, हुज़ैफ़ा खान आणि शरीफ़ शेख यांचा समावेश आहे. पीडिताचे नाव अब्दुल रहमान मकसूद आलम खान आहे. तो कुर्ला परिसरातील रहिवासी आहे. माटुंगा येथील एका कॉलेजमध्ये अकाउंटिंग आणि फायनान्स विषयामधून दुसऱ्या वर्षाचा पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी आहे.
सोमवारी रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास केक कापल्यानंतर आरोपी मित्रांनी अब्दुलवर अंडी आणि दगड फेकण्यास सुरुवात केली. मात्र, त्यावर थांबत न राहता त्यांनी स्कूटीवरून आणलेला ज्वलनशील पदार्थ अब्दुलच्या अंगावर फेकून त्याला आग लावली. अचानक लागलेल्या आगेमुळे अब्दुलने आपले कपडे काढून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो गंभीर जखमी झाला. संपूर्ण घटना सोसायटीच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. अब्दुलने आपले शर्ट उघडे करून फेकले आणि ओरडत बिल्डिंगच्या वॉचमनच्या खोलीकडे धाव घेतली. नंतर त्याने वॉचमनकडून बाटली घेतली आणि नळातून पाणी वापरून आग विझवली. त्यानंतर त्यापैकी एक मित्र हुजैफा आला आणि अब्दुलला रुग्णालयात नेले. चौकशीत आरोपींनी सांगितले की, “वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आम्ही फक्त मौजमस्ती करत होतो, असे गंभीर प्रकार घडेल याची कल्पना नव्हती.”
जखमी अब्दुल रहमानला तातडीने सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडिताने पोलिसांकडे तक्रार नोंदवल्यानंतर विनोबा भावे पोलिसांनी त्वरित कारवाई केली. अयाज़ मलिक, अशरफ़ मलिक, कासिम चौधरी, हुज़ैफ़ा खान आणि शरीफ़ शेख यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 110 (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) आणि कलम 3(5) अंतर्गत FIR नोंदवण्यात आली आहे. कोर्टाने या पाचही आरोपींना 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

