(संगमेश्वर / प्रतिनिधी)
सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायी ठरणारे संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या स्वतःच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. एकीकडे आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब जागोजागी कोसळून लोखंडी सळ्या बाहेर डोकावत आहेत, तर दुसरीकडे गोरगरीब रुग्णांच्या मोफत रक्त व इतर तपासण्या करणारी ‘महालॅब’ १ नोव्हेंबरपासून अचानक बंद करण्यात आली आहे. रुग्णसेवेचे हे केंद्र समस्यांच्या विळख्यात अडकल्याने कडवईसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कडवई, तुरळ, चिखली, रांगव, शेणवडे आणि मासरंग या सहा गावांतील शेकडो ग्रामस्थांसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र मोठा आधारस्तंभ आहे. येथील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तत्पर सेवेमुळे सर्वसामान्यांचा मोफत उपचारांचा मार्ग सुकर झाला होता. मात्र, प्रशासकीय अनास्थेमुळे या आरोग्य केंद्राच्या सुरक्षिततेचा आणि सोयीसुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. शासनाने सर्वसामान्यांच्या हितासाठी या केंद्रात ‘महालॅब’ सुरू केली होती. खासगी प्रयोगशाळांमध्ये हजारो रुपये खर्चून कराव्या लागणाऱ्या तपासण्या येथे मोफत होत असल्याने रुग्णांचा वेळ आणि पैसा वाचत होता. परंतु, १ नोव्हेंबरपासून कोणतीही पूर्वसूचना न देता ही लॅब बंद करण्यात आली आहे. परिणामी, ऐन आजारपणात रुग्णांना तपासण्यांसाठी खासगी लॅबचे उंबरठे झिजवून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
आरोग्य केंद्राच्या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. छताचे प्लास्टर व स्लॅबचे तुकडे वारंवार कोसळत असून आतील गंजलेल्या सळ्या स्पष्ट दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली होती; मात्र ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी त्यावेळीच केला होता. आता ही इमारतच मृत्यूचा सापळा बनली असून, उपचारासाठी येणारे रुग्ण आणि कर्तव्य बजावणारे कर्मचारी अक्षरशः जीव मुठीत धरून वावरत आहेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
“आरोग्य केंद्राची महालॅब बंद झाली आहे, हे वास्तव आहे. तसेच इमारतीचा स्लॅब वारंवार कोसळत असल्याने येथे येणारे रुग्ण आणि कार्यरत कर्मचाऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.”
– डॉ. संतोष यादव, वैद्यकीय अधिकारी
“या इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत कोणताही निधी खर्च झालेला नाही. इमारत पूर्णपणे धोकादायक झाल्याने तिचे नव्याने बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपण शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे.”
– संतोष थेराडे, जिल्हा परिषद सदस्य


