(मुंबई)
गुन्हेगारांना ‘टायरमध्ये घालू’, ‘अमुक ठिकाणी घालू’ अशा कडक शब्दांत जाहीर वल्गना करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील महापालिका निवडणुकीत मात्र आपल्या या तत्त्वांनाच हरताळ फासल्याचे चित्र आहे.
पुण्यात गुन्हेगारीविरोधात कडक भूमिका घेतल्याचा दावा करणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळ्यांनाच उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या दोघी थेट तुरुंगातूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याचबरोबर कुख्यात गजा मारणे यांच्या पत्नीला देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आल्याने ‘गुन्हेगारीमुक्त पुण्याचे स्वप्न’ दाखवणाऱ्या पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यांना सढळ हाताने उमेदवारी देताना, जाहीर सभांतील कडक भाषणांचा विसर पडतो का, असा सवाल आता पुणेकर विचारू लागले आहेत.
मुंबईत शिंदेंपेक्षा ‘दादांचे’ अधिक उमेदवार
पुण्यातील या वादग्रस्त उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही अजित पवारांनी आक्रमक डावपेच राबवले आहेत. मुंबई मनपासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तब्बल ९६ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ९० उमेदवार उभे आहेत. उमेदवारांच्या संख्येतही राष्ट्रवादीने शिंदे सेनेवर सरशी साधली आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवार यादीत सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो. उत्तर भारतीय ११, मराठी ५६, मुस्लिम २३, ख्रिश्चन तीन, तेलगू एक, तमिळ एक आणि बोहरा मुस्लिम एक असे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. महिलांना विशेष संधी देत ५० महिला उमेदवार, तर ४६ पुरुष उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. एससी प्रवर्गातून १२ आणि ओबीसीतून १७ उमेदवार आहेत.
मुंबईत ठाकरे गट आघाडीवर
दरम्यान, मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीचे जागावाटपही स्पष्ट झाले आहे. ठाकरे गट १६३ जागांवर निवडणूक लढवत असून, मनसेला ५३ जागा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ११ जागांवर रिंगणात आहे. त्यामुळे मुंबईत सर्वाधिक उमेदवार ठाकरे शिवसेनेचे असल्याचे चित्र समोर आले आहे. एकीकडे गुन्हेगारीविरोधी कडक भाष्य आणि दुसरीकडे निवडणुकीत वादग्रस्त उमेदवारी, या विरोधाभासामुळे अजित पवारांचे राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पुणे आणि मुंबईतील या राजकीय गणितांमधून मतदार कोणाला पसंती देतात, हे मात्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

