(देवरुख / सुरेश सप्रे)
शासनाच्या ऑनलाइन देयक सेवा नागरिकांपर्यंत जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यात रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीत योगदान देणारे संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार किशोर जोयशी यांचा रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
संगमेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या किशोर जोयशी यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सेवा नागरिकांपर्यंत विनाविलंब आणि प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी काम केले. त्यांच्या तसेच जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्ह्याला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविता आला.
कर्तव्य बजावताना दाखविलेली ही कार्यक्षमता आणि तत्परता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी किशोर जोयशी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. यावेळी पोलीस अधीक्षकांनी भविष्यातही सर्वांनी अशाच प्रकारे निष्ठेने काम करून रत्नागिरी पोलीस दलाचा नावलौकिक अधिक उज्ज्वल करावा, असा विश्वास व्यक्त केला.
किशोर जोयशी यांच्या या गौरवाबद्दल संगमेश्वर पोलीस ठाण्यासह रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


