(देवरुख / सुरेश सप्रे)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत संगमेश्वरच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ९ सुवर्ण, ९ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई केली. या कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१० ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, राजापूर येथे १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात पार पडल्या होत्या. राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, स्पर्धा आयोजक तथा राजापूर तालुका अध्यक्ष अभिजीत तेली तसेच सर्व तालुका पदाधिकारी मुकेश नाचरे, सचिव लक्ष्मण कररा आणि पंच प्रमुख भरत कररा यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा झाल्या.
या स्पर्धेत संगमेश्वर, चिपळूण, खेड, रत्नागिरी, लांजा, राजापूर, दापोली आणि गुहागर तालुक्यांतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंनी सहभाग घेतला. जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या खेळाडूंची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धा १ ते ३ ऑक्टोबर २०२६ रोजी रेणुका हॉल, वाठार, तळसंदे रोड, तळसंदे, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथे होणार आहे.
मीनाताई ठाकरे हायस्कूल, साडवलीच्या १४ वर्षांखालील मुलींमध्ये दुर्गा मोघे हिने कांस्यपदक मिळवले, तर सांची मुंडेकर हिने सहभाग नोंदवला. याच वयोगटातील मुलांमध्ये आर्य भोसले आणि सोमांश सावंत यांनी सहभाग घेतला. १७ वर्षांखालील मुलींमध्ये सिया सागवेकर हिने सुवर्णपदक, तर मुलांमध्ये आदित्य चिपळूणकर याने सुवर्णपदक पटकावले. १९ वर्षांखालील मुलींमध्ये भुमिका शिंदे हिने सुवर्णपदक, तर समृद्धी घडशी हिने कांस्यपदक मिळवले.
अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मिडियम स्कूल, देवरुखच्या १४ वर्षांखालील मुलींमध्ये रितिशा कांगणे हिने सुवर्णपदक मिळवले. मुलांमध्ये अधिराज कदम याने सुवर्णपदक, तर वेदांत मसुरकर याने कांस्यपदक पटकावले. १७ वर्षांखालील मुलांमध्ये यशराज कटके याने सुवर्णपदक, साहिल जागुष्टे याने कांस्यपदक मिळवले, तर शौर्य लोध याने सहभाग घेतला.
आश्रम शाळा, निवे बु.च्या १४ वर्षांखालील मुलींमध्ये भक्ती गुरव हिने रौप्यपदक आणि स्वरा धोपावकर हिने कांस्यपदक पटकावले. १७ वर्षांखालील मुलींमध्ये सान्वी रसाळ हिने रौप्यपदक मिळवले. याच वयोगटातील मुलांमध्ये आर्यन यादव आणि ऋतिक रसाळ यांनी रौप्यपदक मिळवले, तर युवराज केतकर याने सहभाग घेतला. १९ वर्षांखालील मुलींमध्ये सान्वी जाधव हिने रौप्यपदक पटकावले.
लोक विद्यालय, तुळसणीच्या १७ वर्षांखालील मुलींमध्ये श्रावणी ईप्ते हिने सुवर्णपदक मिळवले, तर मृणल जाधव हिने सहभाग घेतला. ताम्हणे हायस्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांमध्ये प्रभात रहाटे आणि १७ वर्षांखालील मुलींमध्ये पुर्वा रहाटे यांनी सहभाग नोंदवला.
न्यू इंग्लिश स्कूल, देवरुखच्या १४ वर्षांखालील मुलांमध्ये अफजान फुलारी याने सुवर्णपदक मिळवले. १९ वर्षांखालील मुलींमध्ये सान्वी जागुष्टे आणि सेजल बावधने यांनी रौप्यपदक पटकावले. पैसाफंड हायस्कूल, संगमेश्वरच्या १४ वर्षांखालील मुलांमध्ये पियुष रहाटे आणि १७ वर्षांखालील मुलांमध्ये प्रथमेश शेट्ये यांनी रौप्यपदक मिळवले. न्यू इंग्लिश स्कूल, कसबा येथील १७ वर्षांखालील मुलांमध्ये सोहम चव्हाण याने सुवर्णपदक पटकावले. दादासाहेब सरफरे विद्यालय, बुरंबीच्या १७ वर्षांखालील मुलींमध्ये श्रेया मोरे हिने सहभाग घेतला.
या यशस्वी तायक्वांदोपटूंचा छोटेखानी सत्कार समारंभ नगरपंचायत देवरुख येथे आयोजित करण्यात आला. यावेळी तालुका अकॅडमीच्या उपाध्यक्षा सौ. स्मिता लाड, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, संदेश जागुष्टे आदी उपस्थित होते. खेळाडूंना स्वप्निल दांडेकर, साईप्रसाद शिंदे, सुमीत पवार, मयुरी राऊत आणि करण जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
संगमेश्वरच्या तायक्वांदोपटूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव अभिजीत शेट्ये, क्लब उपाध्यक्षा ॲड. सौ. पुनम चव्हाण, खजिनदार चिन्मय साने, स्वाती नारकर, पालक प्रतिनिधी तसेच सर्व नगरसेवक आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले.


