( रत्नागिरी / वार्ताहर )
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नियंत्रित करण्यासाठी मडगाव जंक्शन-नागपूर जंक्शन तसेच मडगाव जंक्शन-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) दरम्यान विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांना रत्नागिरीसह कोकणातील अनेक प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वेने १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, या गाड्या ‘एक्स्ट्रा रश’ तसेच गणपती विशेष म्हणून चालविण्यात येणार आहेत.
मडगाव-नागपूर विशेष गाडी
गाडी क्रमांक 01140 मडगाव जंक्शन-नागपूर जंक्शन विशेष दर मंगळवारी मडगावहून रात्री ७ वाजता सुटेल. १८ ऑगस्ट, २५ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२६ रोजी ही गाडी अतिरिक्त गर्दीसाठी धावणार आहे. तर ८ सप्टेंबर, १५ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर रोजी ती गणपती विशेष म्हणून धावेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ९.२५ वाजता नागपूर जंक्शनला पोहोचेल.
परतीची गाडी क्रमांक 01139 नागपूर-मडगाव विशेष दर बुधवारी रात्री ११.४५ वाजता नागपूरहून सुटेल. १९ ऑगस्ट, २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी ती अतिरिक्त गर्दीसाठी, तर ९, १६ आणि २३ सप्टेंबर रोजी गणपती विशेष म्हणून धावणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता मडगावला पोहोचेल.
या गाडीला करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे असतील.
मडगाव-मुंबई विशेष गाडी (मडगाव जंक्शन-लोकमान्य टिळक टर्मिनस)
गाडी क्रमांक 01004 मडगाव जंक्शन-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष दर रविवारी मडगावहून दुपारी ४ वाजता सुटेल. २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर २०२६ रोजी ही गाडी अतिरिक्त गर्दीसाठी, तर १३, २० आणि २७ सप्टेंबर रोजी गणपती विशेष म्हणून धावणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
परतीची गाडी क्रमांक 01003 लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव विशेष दर सोमवारी सकाळी ७.५० वाजता मुंबईहून सुटेल. २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी ती अतिरिक्त गर्दीसाठी, तर १४, २१ आणि २८ सप्टेंबर रोजी गणपती विशेष म्हणून धावेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता मडगावला पोहोचेल.
या गाडीला करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेन, पनवेल आणि ठाणे येथे थांबे देण्यात आले आहेत.
१९ डब्यांची विशेष गाडी
दोन्ही विशेष गाड्यांना एकूण १९ डबे असतील. यामध्ये ३ थ्री-टियर एसी डबे, ८ स्लीपर डबे, ६ जनरल डबे आणि २ एसएलआर/डी डबे असतील.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणातून मुंबई, विदर्भ तसेच परतीच्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या विशेष गाड्यांमुळे नियमित गाड्यांवरील गर्दी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
विशेष गाड्यांचे सविस्तर थांबे, वेळापत्रक आणि आरक्षणाची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीचे वेळापत्रक आणि धावण्याची स्थिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे.
गणपती विशेष गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिकीट आरक्षणासाठी ‘रेलवन’ ॲपचा वापर करता येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करून शक्य तितक्या लवकर तिकीट आरक्षित करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
या विशेष गाड्यांच्या मार्गावरील विविध स्थानकांवरील आगमन व प्रस्थानाच्या सविस्तर वेळांची माहिती भारतीय रेल्वेच्या अधिकृत रेल्वे चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचबरोबर NTES (National Train Enquiry System) ॲपद्वारे गाडीचे सद्य वेळापत्रक, धावण्याची स्थिती आणि वेळांमधील अद्ययावत बदलांची माहिती प्रवाशांना मिळू शकते.

