(रत्नागिरी)
खल्वायन रत्नागिरी या संस्थेची प्रतिवर्षांप्रमाणे दिवाळी पाडवा विशेष संगीत मैफल बुधवार दि. 22 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5 ते 7. 30 या वेळात सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय ( हॉल) , एस.टी. स्टँड समोर, रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली. मे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे प्रायोजकत्व लाभलेली ही मैफल मुग्धा गांवकर ह्या गोव्याच्या प्रसिद्ध युवा गायिकेच्या मधुर तेवढ्याच दमदार स्वरांनी श्रोत्यांना परमानंद देऊन गेली.
कार्यक्रमाचे सुरुवातीला रत्नागिरी चे प्रसिद्ध उद्योजक श्री. अनंतराव आगाशे यांचे हस्ते नटराज पूजन, दीपप्रज्वलन होऊन श्रीफळ वाढविले गेले. मैफिलीची सुरवात राग दिन की पुरिया मधील बडा ख्यालाने झाली. त्यानंतर राग बागेश्री मधील एक बंदिश सादर झाली. शास्त्रीय संगीताची पक्की तालीम आणि सातत्यपूर्ण रियाजातून त्यांनी स्वरांवर मिळविलेली हुकूमत आणि उत्स्फूर्तपणे सादरीकरण हे त्यांचे गुण वाखाणण्याजोगे आहेत. तसेच दमदार सूर, दमदार आलाप ताना आणि तारसप्तकातील सुरांचा सुद्धा तेवढाच सहज सुंदर लगाव यामुळे मैफल सुरवातीपासून रंगतदार होत गेली. त्यानंतर श्री गुरु सारिखा,लागी कलेजवाँ कटार ,बगळ्यांची माळ फुले, ताने स्वर रंगवावा आणि शेवटी हरि म्हणा हरि म्हणा ह्या पदाने मैफलीचा शेवट झाला.
सदरहू मैफलीला हार्मोनियम व तबला साथसंगत रत्नागिरीचे प्रसिद्ध वादक श्री. चैतन्य पटवर्धन व श्री. प्रथमेश शहाणे व तालवाद्य साथ श्री. सुहास सोहनी ह्यांनी तेवढीच तोलामोलाची केली. मैफल यशस्वितेसाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, र. ए. सोसायटी, गोदुताई जांभेकर विद्यालय, संजय बर्वे, दिलीप केळकर, रविकांत शहाणे इत्यादी चे मोलाचे सहकार्य लाभले.

