( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा महाविद्यालयाजवळ आज सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी झालेल्या गॅस टँकरच्या अपघाताने संपूर्ण परिसर पुन्हा हादरला. जयगडहून कोल्हापूर मार्गे बंगलोरकडे जाणारा गॅस टँकर हातखंबा महाविद्यालयाजवळ आला असता चालक सय्यद अबू तागिर ओलीम (वय 62 राहणार तामिळनाडू ) यांचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरला एका बाजूने घासत ओव्हरटेक करताच तीव्र उतारातून वेगात असलेला टँकर थेट महामार्गालगत पार्क केलेल्या चार दुचाकीं धडकत अखेरीस खाऊच्या टपरीत घुसला. अपघातात टपरीतील एक महिला जखमी झाली असून टँकर चालकालाही किरकोळ दुखापत झाल्याने दोघांनाही तातडीने हातखंबा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ही घटना आज, सोमवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे, शाळा सुटण्यास केवळ काही मिनिटांचा अवधी असतानाच ही धडक झाली. त्यामुळे मोठा अनर्थ थोडक्यात टळल्याने पालक आणि शिक्षक वर्गाने सुटकेचा निश्वास टाकला. अपघातात टपरीचे मोठे नुकसान झाले असून चार दुचाकी पूर्णतः चिरडल्या गेल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी याप्रकरणी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करत तासभर रस्त्यावर ठिय्या मांडला. नागरिकांचा रोष इतका तीव्र होता की, त्यांनी अपघातग्रस्त दुसरा गॅस टँकर मार्गावरच रोखून धरला आणि महामार्ग ठप्प केला. जोपर्यंत संबंधित ठेकेदार घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यामुळे काही काळासाठी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. मात्र, अत्यावश्यक सेवांची वाहने मात्र ग्रामस्थांनी मार्गस्थ होऊ दिली.
गेल्या काही दिवसांपासून महाविदलयाजवळ नव्या पुलाचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेले चढणीचे वळण वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. चढावर वाहनं बंद पडतात, तर उतारावर गाड्यांचा वेग प्रचंड वाढतो. नियोजनाचा अभाव आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्याने अशा अपघातांची पुनरावृत्ती होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या भागात अवघ्या आठ दिवसांत गॅस टँकर उलटण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी माईनकर आणि दंगा नियंत्रण पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र, स्थानिकांनी ठाम भूमिका घेत, जोपर्यंत महामार्गाच्या कामाचा ठेकेदार घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत गॅस टँकर मार्गस्थ होऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा घेतला. या आंदोलनामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. महामार्गावर दुतर्फा वाहने रांगेत अडकून पडली होती, तर अपघातस्थळी नागरिकांचा संतप्त आवाज घुमत होता. गणेशोत्सवासारखा मोठा उत्सव जवळ येत असताना, अशा अपघातप्रवण भागांमध्ये तातडीने ठोस उपाययोजना व्हाव्यात, अन्यथा लोकांचा संयम सुटेल, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाला अपघातस्थळीच आवश्यक त्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.
चढणीचा रस्ता वाहनचालकांसाठी डोकेदुखी
महामार्गावरील ठेकेदाराने नव्याने तयार केलेला चढणीचा रस्ता सध्या वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. या भागातील रस्त्याची रचना आणि अपुरी नियोजनबद्धता यामुळे दररोज वाहनांची कोंडी आणि अपघाताची शक्यता वाढत चालली आहे. चढणीच्या भागात अनेक वाहने वारंवार अडकून पडत असून, ती पुढे सरकण्यासाठी अन्य वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, उताराच्या दिशेने येणाऱ्या अवजड वाहनांचा वेग अत्यंत प्रचंड होत असून, अशा वेळी वाहनांवर नियंत्रण ठेवणे चालकांसाठी कठीण बनत आहे. परिणामी, अपघातांची शक्यता आणखी वाढली आहे.
नव्या पुलाचे काम धिम्या गतीने सुरू
महामार्गालगत महाविद्यालयापासून ते दर्ग्यापर्यंत उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. या अपूर्ण कामामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे मात्र तोही सुरक्षित नाही आणि पुरेसा रुंदही नाही. या सर्व परिस्थितीमुळे वाहनचालकांना दुहेरी अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे चढणीचा धोकादायक रस्ता आणि दुसरीकडे अपूर्ण पुलामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी. या ठिकाणी नेहमीच गोंधळाचे आणि अपघातजन्य वातावरण निर्माण होत आहे, जे दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. या अपघातप्रवण वळणावर आणि अपूर्ण कामावर प्रशासन तातडीने लक्ष देणार की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
निवळीनजीक गॅस टँकरचा अपघात
निवळी-गणपतीपुळे मार्गावर दिनांक ४ ऑगस्ट 2025 रोजी सकाळच्या सुमारास कोल्हापूरमार्गे बंगलोर गॅस घेऊन जाणारा टँकर सकाळी सहाच्या सुमारास निवळी फाट्याजवळच चालक हरिश्चंद्र पटेल (वय 52 राहणार उत्तर प्रदेश) याचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या घटनेमुळे काही काळासाठी परिसरात खळबळ उडाली, मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. टँकरचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टँकरमधील गॅस अत्यंत ज्वलनशील स्वरूपाचा असल्याने वाहनचालकांसह नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, गॅस गळती झाल्याचे कोणतेही निदर्शनास आलेले नाही.
दोन्ही अपघातांत गॅस गळती नाही
सुदैवाने या दोन्ही अपघातांत कोणतीही गॅस गळती झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाली. वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला असला तरी ती नंतर सुरळीत करण्यात आली. या घटनांनंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दोन्ही अपघातस्थळांना भेट देत पाहणी केली व संबंधित विभागांना योग्य त्या सूचना दिल्या. एकाच दिवशी दोन अपघात झाल्याने महामार्गावरील गॅस वाहतूक सुरक्षेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
तातडीची संयुक्त बैठकीत पोलीस अधीक्षकांचे निर्देश
हातखंबा आणि निवळी येथे घडलेल्या सलग दोन गॅस टँकर अपघातांच्या पार्श्वभूमीवर गॅस कंपनीचे अधिकारी, महामार्ग प्राधिकरण (NHAI), प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), पोलीस प्रशासन आणि रस्ते कंत्राटदार यांची तातडीची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत टँकर वाहतूक अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. चालकांच्या सुरक्षिततेसाठी चालकांची नियमित वैद्यकीय तपासणी, थकवा चाचणी (Fatigue Test), दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई, मोबाईलचा वापर बंदी, प्रत्येक टँकरसोबत सहाय्यक चालक असणे, युनिफॉर्म सक्ती, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, टँकर ताफा एस्कॉर्ट पथकासह फक्त २० किमी प्रतितास वेगाने आणि सुरक्षित अंतर ठेऊन वाहतूक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले आहेत.
हातखंबा येथे कायमस्वरूपी बचाव वाहन तैनात
तसेच हातखंबा येथे कायमस्वरूपी बचाव वाहन तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला असून, बचाव पथकाला विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. टँकरमधील युटिलिटी व सेफ्टी व्हॉल्व्ह तसेच फ्रेम डिझाइनमध्ये सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक बदल करण्याचेही निर्देश देण्यात आले असून महामार्ग प्राधिकरण व RTO यांना महामार्गावर सुरक्षितता फलक लावणे, अपघातप्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणे, रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करणे, वाहनचालकांसाठी जनजागृती शिबिरे आयोजित करणे, टँकरची अचानक तपासणी, ओव्हरलोडिंग व दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षक बगाटे यांनी दिले आहेत.