(जाकादेवी / वार्ताहर)
सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षेसाठी जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकूण २६१ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यामध्ये एलिमेंट्री परीक्षेसाठी १२२, तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी १३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
जाकादेवी परिसरातील विविध माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षा केंद्रावर सहभाग नोंदविला आहे. जाकादेवी विद्यालयासह विल्ये, पोचरी, आगरनरळ, देऊड, फुणगुस आणि धामणसे या सात माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत.
या परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक म्हणून केंद्र शाळेचे मुख्याध्यापक नितीन मोरे काम पाहत आहेत. कलाशिक्षक प्रणित जाधव हे केंद्र उपसंचालक, तर प्रदीप अ. पवार हे सहाय्यक केंद्र उपसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा मालगुंड शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्राचे मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे.
मालगुंड शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील उर्फ बंधू मयेकर यांनी परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


