(लांजा /रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुलाजवळ प्रवासी ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोरदार धडक देणाऱ्या १६ चाकी ट्रकचालकाविरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात ट्रॅव्हल्समधील २२ प्रवासी आणि ट्रकचालक असे एकूण २३ जण जखमी झाले होते. शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथील उताराच्या वळणावरून मालवणच्या दिशेने प्रवासी ट्रॅव्हल्स (एमएच ४८ डीसी ९४३९) जात होती. यावेळी ग्रॅनाईट व महिंद्रा कंपनीचे साहित्य घेऊन जाणारा १६ चाकी टाटा एलपीटी ट्रक (आरजे १९ जीजे ४७८६) भरधाव वेगाने पाठीमागून आला. आंजणारी पुलावरील वळणावर ट्रकने ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिली. ट्रकचालकाने सार्वजनिक रस्त्यावर हयगयीने व बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या धडकेत ट्रॅव्हल्समधील २२ प्रवाशांसह ट्रकचालक जखमी झाला. जखमींमध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी ट्रॅव्हल्समधील प्रवासी ऋषिकेश अनंत जोशी (२३, रा. विरार, जि. पालघर; मूळ गाव शिवणे, ता. गुहागर) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रकचालक दिलावर सुमार खान (३६, रा. जैसलमेर, राजस्थान) याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १२५ (अ), १२५ (ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लांजा पोलीस करीत आहेत.


