(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरणातील पाणीसाठा हा जयगड प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत गेली ३५ ते ४० वर्षे जिल्हा परिषद नळ पाणीपुरवठा (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) उपअभियंता कार्यालय, रत्नागिरी यांच्या मार्फत चालविला जात आहे. या योजनेचा लाभ जयगड, लावगण, कासारी, चाफेरी, वाटद, खंडाळा, सैतवडे, गुंबद, जांभारी, कोळीसरे, गडनरळ, कळझोंडी परिसरातील २७ गावांना होत आहे. धरणात सध्या पाण्याचा साठा मुबलक आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. याशिवाय, धरण परिसर आजूबाजूच्या झाडाझुडपांनी व्यापलेला असून त्यांची देखभाल केली जात नाही.
विशेष म्हणजे, या धरणातून २७ गावांना पाणीपुरवठा केला जात असला तरी पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक असलेली टी.सी.एल. पावडर टाकली जात नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, धरणाची उंची वाढविण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. नवीन पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे तसेच नवीन पंपही बसविण्यात आले आहेत. तरीसुद्धा नवीन टाकीत अस्वच्छ पाणी शिल्लक असल्याने, हे पाणी बाहेर काढून नवीन पंप सुरू करून पाइपलाइनद्वारे लवकरात लवकर स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.