(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील रांगव (गवळवाडी ) येथील संदीप सिताराम थोरवसे (वय वर्षे 40) या अविवाहित युवकाने राहत्या घरी आत्महत्त्या करून जीवनयात्रा संपवली. ही घटना रविवारी पहाटे च्या सुमारास घडल्याचे समजते.
संदीप त्याची आई तसेच त्याचा थोरला भाऊ हे नित्यनियमाप्रमाणे एकत्र रात्रीचे जेवण आटोपून झोपी गेले. पहाटे संदीपच्या आईला जाग आली तेव्हा संदीप दिसून न आल्याने भयभीत झालेल्या संदीपच्या आईने मोठ्या मुलाला उठवले व घरात शोध घेतला. मात्र तॊ कोठेच दिसून न आल्याने संदीप च्या आईने त्यांच्याच मालकीच्या असलेल्या बाजूच्या बंद घराचा दरवाजा उघडला असता छताच्या वाश्याला नायलॉन रस्सीने गळफास घेऊन लटकत असलेल्या स्वतःच्या मुलाचे समोरचे दृश्य पाहून तीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने जोरात हंबरडाच फोडला.
संदीपच्या थोरल्या भावाने त्या ठिकाणी धाव घेत समोरची परिस्थिती पाहून गावचे पोलीस रुपेश कदम माहिती दिली. तर पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून आत्महत्या झाल्याची माहिती संगमेश्वर पोलीस ठाण्याला देताच पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे, आव्हाड यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अधिक तपास करत आहेत.
रात्री झोपी गेलेल्या संदीप ने पहाटे उठून बाजूच्या घरात जाऊन गळफास घेऊन स्वतःच्या जीवनयात्रेला का पूर्णविराम दिला. अचानक एवढ्या टोकाची भूमिका का घेतली, अशी चर्चा केली जात असतानाच गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.