(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या कारभारावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गावात प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गावातील काही भागांतील पथदिवे गेल्या आठ दिवसांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासह गावातील रस्ते, मोहल्ले आणि वाडीवस्त्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात रानटी झाडी व गवत वाढल्याने अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोरील परिसरातही झाडी वाढलेली असताना प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
रस्त्यांच्या कडेला वाढलेल्या घनदाट झाडीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिसरातील स्वच्छता राखणे आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी असताना त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
दुसरीकडे, संगमेश्वर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांच्या कडेला वाढलेली घनदाट झाडी बिबट्यासारख्या वन्यप्राण्यांना लपण्यासाठी अनुकूल ठरू शकते. त्यातच कुरधुंडा गावातील काही भागांतील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. सध्या गावात नवरात्रोत्सव सुरू असून, दर्शनासाठी तसेच विविध कार्यक्रमांना जाणाऱ्या महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरमहा कर वसुली करताना तत्परता दाखवणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्यात मात्र दुर्लक्ष होत असल्याचा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात आणि बिबट्याचा वावर वाढलेला असताना पथदिवे बंद राहण्यामागचे कारण काय, असा प्रश्नही नागरिकांनी विचारला आहे.
या पार्श्वभूमीवर कुरधुंडा ग्रामस्थांनी १५ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि सचिव यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत निवेदन सादर केले. बंद असलेले पथदिवे तातडीने सुरू करावेत, तसेच उत्सवाच्या काळात पथदिवे बंद का ठेवण्यात आले, याचा लेखी खुलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आता ग्रामपंचायत प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन पथदिवे सुरू करण्यासह स्वच्छतेच्या प्रश्नावर कोणती कार्यवाही करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


