(साखरपा / वार्ताहर)
साखरपा तसेच परिसरातील गावांमध्ये मागील काही दिवसांपासून महावितरणच्या विद्युत पुरवठ्यातील अनियमितता सामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गाच्या तळपायाच्या भेगा डोक्यावर आणत आहे. सततच्या लाईटच्या ये-जा आणि कमी व्होल्टेजमुळे नागरिक त्रस्त झाले असून, महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून लाईटचा लपंडाव सुरू आहे. मात्र कालच्या वळिवामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. काल रात्री उशिरा काही काळ विजेचा पुरवठा सुरळीत झाला, पण आज सकाळपासून पुन्हा सतत ये-जा सुरू आहे. विशेषतः बाजारपेठ भागात कमी व्होल्टेजचा त्रास जाणवत असून यामुळे फ्रीज, लाईट्स, फॅनसारखी उपकरणे बंद पडत आहेत. परिणामी व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. सध्या चाकरमान्यांच्या आगमनामुळे बाजारपेठेत व्यापारी व्यवसाय जोमात सुरू आहेत. मात्र विजेअभावी व्यवसाय ठप्प होत असून ग्राहकही नाराजी व्यक्त करत आहेत. विजेच्या सततच्या अनियमिततेमुळे इलेक्ट्रिक उपकरणांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, महावितरणचे स्थानिक कर्मचारी क्षेत्रात कार्यरत असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. महावितरणकडून वापरले जाणारे साहित्यही सुमार दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एकाच पावसात जर अशी अवस्था असेल, तर आगामी पावसाळ्यात काय परिस्थिती असेल, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
या विजेच्या लपंडावामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना न झाल्यास ग्रामस्थांचा उद्रेक अटळ असल्याचे चित्र सध्या साखरपा परिसरात पाहायला मिळत आहे.