(संगमेश्वर / एजाज पटेल)
लोवले हद्दीत येणाऱ्या संगमेश्वर-देवरुख मुख्य मार्गलगत उभा डोंगर कापून येथील उत्खनन करण्यात येणारी माती आणि काळा दगड अन्य ठिकाणी वाहतूक करण्याचे सत्र कायम असून, नेमका उत्खनन करण्याचा परवाना किती आहे आणि वाहतूक परवाना आहे का? आणि किती आहे. परवान्यापेक्षा जास्त उत्खनन झाले असेल आणि ते उत्खनन परवानगी मुदतीनंतर झाले असेल तर दंडात्मक कारवाई की रॉयल्टी भरून घेऊन त्या परप्रांतीय जमीन मालकाला “अर्थपूर्ण” कृपशीर्वाद देणार काय? अशी संतप्त चर्चा संगमेश्वर शहरात सुरु आहे. तरी याबाबत स्वतः जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालणं गरजेचे आहे.
गेले काही महिने संगमेश्वर एसटी स्टॅन्ड पासून अगदी हाकेच्या अंतरावर संगमेश्वर-देवरुख मुख्य मार्गालगत असलेला उभा डोंगर जेसीबी आणि पोकलेन्डच्या सहाय्याने कापण्याचे काम जोमाने सुरु असून माती बरोबर काळा दगडही मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. हे करताना मोठमोठे दगड मुख्य रस्त्यावर अनेकदा गडगडत येत असल्याने वाहन चालकांच्या मनात अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी येथील रस्त्यावरून वाहने जात असताना भलामोठा दगड रस्त्यावर आल्याने अपघात होणार होता, मात्र वाहनचालकांनी पुढचे गांभीर्य लक्षात घेत वाहने थांबवल्याने अपघात टळल्याची सुद्धा चर्चा आहे. सुरक्षेभावी येथील वर्दळीला धोका असल्याने वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन येथून वाहने हाकावी लागत आहेत.
गेले काही महिने राजरोसपणे सुरु असलेले उत्खनन व उत्खनन करण्यात येणारी माती व दगड वाहतूक संदर्भात येथील स्थानिक सबंधित अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता 200 ब्रासची परवानगी असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र 200 ब्रास पेक्षा उत्खनन कित्येक पटीने अधिक करण्यात आले आहे. हे सबंधित विभागाला दिसून येत असतानाही ते डोळसपणे वावरत असले तरी सर्वसामान्यांच्या नजरेतून मात्र चुकत नव्हते. त्यामुळे सबंधित विभागाला जागृत करण्यासाठी छायाचित्रासाह वृत्त प्रसारित करण्यात आले.
आपण एका परप्रांतीयाला अर्थपूर्ण आशीर्वाद देत आहोत याचे बिंग फुटेल असे वाटू लागले असावे की काय? म्हणून पुन्हा पंचनामा करण्याच्या हालचाली सुरु होऊन सुरुवातीला 200 ब्रास घेतलेल्या परवानगी पेक्षा अधिक उत्खनन केल्याचे उघड झाल्याने व ते लपवता येणार नसल्याने सबंधिताला जास्त उत्खनन करण्यात आले आहे, त्याची रॉयल्टी भरण्यात आली असेल तर स्थानिक सबंधित प्रशासनाला माहिती सादर करावी अन्यथा सबंधित गोष्ट वरिष्ठाच्या निदर्शनास आणून दिली जाईल अशी नोटीस देण्याची तसदी घ्यावी लागली.
परवानगी असलेल्या 200 ब्रास उत्खननाचा कालावधी किती होता. कालावधी संपल्यानंतर प्रमाणापेक्षा जास्त उत्खनन झाले असेल आणि तेही प्रसार माध्यमाद्वारे उघड झाल्यानंतर कार्यवाईचा बडगा उचलणाऱ्या सबंधित विभागाने दंड आकारून शासनाच्या तिजीरीला आर्थिक भर लावायचा आहे की, वाढीव रॉयल्टी भरण्याची सवलत देऊन उत्खनन करणाऱ्या त्या परप्रांतीयाला “अर्थपूर्ण” कारभारामुळे कृपाशीर्वाद द्यायचा आहे, अशी शंका चर्चेतून उपस्थित केली जात असल्याने जिल्हाधिकारी यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी केली जात आहे.