(संगमेश्वर / एजाज पटेल)
बावननदी ते आरवलीदरम्यान सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांमध्ये सुरक्षेचा पूर्ण अभाव असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. ठेकेदाराला सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या असतानाही त्या वारंवार धाब्यावर बसवल्या जात असल्याच्या घटना समोर येत आहेत.
कुरधुंडा येथे जे. एम. म्हात्रे कंपनीकडून काळा दगड असलेल्या डोंगरावर मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने स्फोटक वापरून खोदकाम सुरू आहे. मात्र, यामुळे आसपास दगडांचे तुकडे अनियमितरीत्या उडत आहेत. अशाच प्रकारे शनिवारी रमजान गोलंदाज हे दुचाकीवरून जात असताना उडालेल्या दगडांपैकी दोन दगड त्यांच्या अंगावर आदळले. एक दगड त्यांच्या पायाला आणि दुसरा दगड हाताला लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.
जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातानंतर संबंधित कंपनीविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेपर्वाई आणि धमकीचा आरोप
गोलंदाज यांनी कामाच्या ठिकाणी तातडीने काम थांबवण्याची मागणी केली. यानंतर त्यांनी कंपनीच्या जी.एम. हलशेठ यांच्याशी संपर्क साधून “सुरक्षेसाठी पत्रे किंवा नेट बसवावेत” अशी विनंती केली. मात्र, त्यावर “तुला कोणाला बोलवायचं आहे त्याला बोल, माझं कोणी काही करू शकत नाही” अशी उद्धट आणि धमकीवजा प्रतिक्रिया दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
सुरक्षेची मागणी
महामार्गावरील काम दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य उपाययोजना,जसे की संरक्षण जाळ्या किंवा पत्रे लावणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने आणि ठेकेदार कंपनीने गांभीर्याने पावले उचलणे गरजेचे असल्याने स्थानिकांनी तशी मागणी केली आहे.