(राजापूर /रत्नागिरी प्रतिनिधी)
रस्त्याने चालत जाणाऱ्या ७५ वर्षीय काकाला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून चुलत पुतण्याने लाकडाने मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील ओझर-राबंडवाडी येथे घडली. या प्रकरणी राजेंद्र राजाराम वालम (वय ३७, रा. ओझर तांबळवाडी, ता. राजापूर) याच्याविरुद्ध राजापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८(१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी झिमाजी हरी वालम (वय ७५) हे त्यांचे चुलत भाऊ दत्ताराम केशव वालम आणि शेजारी प्रदीप विठोबा मालपेकर यांच्यासोबत राबंडवाडीतील रस्त्याने चालत जात होते. त्यावेळी त्यांच्याच वाडीत राहणारा चुलत पुतण्या राजेंद्र वालम हा समोरून येताना दिसला. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, राजेंद्र याने त्यांना पाहून अपशब्द वापरले. त्यावर झिमाजी वालम यांनी ‘शिवी का देतोस?’ अशी विचारणा केली. त्यानंतर राजेंद्र कोणतेही उत्तर न देता पुढे निघून गेला. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर तो हातात लाकूड घेऊन मागून आला आणि झिमाजी वालम यांच्या डाव्या बाजूच्या कंबरेवर लाकडाने मारहाण केली, असा आरोप फिर्यादीने केला आहे. या हल्ल्यात झिमाजी वालम जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र वालम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजापूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


