(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी धरण मार्गावरील तिसंग ते जि.प.शाळा कळझोंडी नं.१ या दरम्यान लाखो रुपये खर्च करून वाहतूक आणि रहदारीसाठी ब्रीज बांधण्यात आला आहे. परंतु या ब्रीज ला संरक्षण भिंत नसल्याने सध्या धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. तसेच हा ब्रीज अरुंद असल्याने या मार्गावरून सातत्याने ये जा करणाऱ्या वाहनचालक, शालेय मुलांना, ग्रामस्थ रहिवासी यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
हा पूल( ब्रीज) तिसंग कळझोंडी नंबर एक या शाळेच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे या पुलावरून दररोज लहान मुले शाळेसाठी ये जा करीत असतात.तसेच याच पुलावरून लहान मोठी वाहने ये जा करीत असतात. त्यामुळे सदरच्या पुलाची(ब्रीज)ची रूंदी ही वाढविण्यात यावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कळझोंडी धरण ते वरचे वरवडे मार्गावरील रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या मुख्य रस्त्यावर आल्या असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना फार मोठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. संबंधित खात्याने रस्त्यावर आलेल्या फांद्या, झाडी, झुडपे तोडून सदरचा रस्ता हा वाहतूकीस सुरळीत करावा अशीही मागणी येथील नागरिकांनी केली आहे.