(रत्नागिरी /प्रतिनिधी)
पाली येथे महामार्गावर पेट्रोलपंपाकडे जाण्यासाठी दुचाकीने वळण घेत असताना मागून भरधाव आलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार मनोहर गुणाजी बारे (५२, रा. पाली बाजारपेठ, एस.टी. स्टॅण्डजवळ) यांचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी मीनल मनोहर बारे (४८) जखमी झाल्या. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी कारचालक सुशांत रमेश नेर्लेकर (३८, रा. जुना बुधवारपेठ, कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर बारे हे पत्नी मीनल यांना दुचाकीवर मागे बसवून पाली येथून रत्नागिरीकडे निघाले होते. त्यांना पाली-वळके येथील मामा शिरीष सोमाजी शिवगण यांच्याकडे जायचे होते. दरम्यान, दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी जोशीवाडी येथील सबुरी हॉटेल व लॉजजवळ असलेल्या पेट्रोलपंपाकडे जाण्यासाठी ते महामार्गावरील डिव्हायडर क्रॉसिंगजवळून जात होते. याचवेळी पालीहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या हुंडाई ऑरा कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. फिर्यादी अभिजित मनोहर बारे यांच्या तक्रारीनुसार, कारचालकाने वाहन वेगाने चालवत असताना रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेतल्याने हा अपघात झाला.
धडकेनंतर मनोहर बारे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मीनल बारे यांनाही अपघातात दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कारचालकाने जखमी दाम्पत्याला आपल्या कारमधून रुग्णालयात नेल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच हाटखंबा वाहतूक मदत केंद्र तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मनोहर यांचे पुत्र अभिजित मनोहर बारे (२४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक सुशांत नेर्लेकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताबाबत पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


