(रत्नागिरी / वार्ताहर)
मुंबई–गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील अंजणारी पुलावर आज पहाटे ट्रक आणि खासगी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.
यावेळी पालकमंत्री सामंत यांनी डॉक्टरांकडून जखमींच्या प्रकृतीची सद्यस्थिती, त्यांच्यावर सुरू असलेले उपचार आणि वैद्यकीय सुविधांची माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना तातडीने आणि योग्य उपचार मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा आणि मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.
याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्यासह रुग्णालय प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.


