(चिपळूण/ रत्नागिरी)
सूर्यास्तापासून सूर्योदयापूर्वीच्या काळात अंधाराचा फायदा घेत आपले अस्तित्व लपवून संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या एका इसमाला चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. ही कारवाई २७ सप्टेंबर रोजी रात्री कळंबस्ते येथील विठ्ठल मंदिराजवळ करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश लक्ष्मण गमरे (४५, रा. कळंबस्ते बौद्धवाडी, ता. चिपळूण) हा रात्री सुमारे ११ वाजता विठ्ठल मंदिराजवळ संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. तो अंधाराचा फायदा घेत स्वतःचे अस्तित्व लपवून उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या हालचालीबाबत समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई केली.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी प्रतिक भिकाजी रहाटे (३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम १२२ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलिसांकडून सुरू आहे.


