(खेड/ रत्नागिरी)
भेलसई ते खेर्डी असा प्रवास करताना भेलसई खांबेवाडी येथील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला २१ वर्षीय तरुण जखमी झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने हा अपघात घडल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
रविंद्र भागुराम तांबे (वय २६, रा. भेलसई बौद्धवाडी, ता. खेड) असे मृत तरुणाचे नाव असून, हर्षद संजय तांबे (वय २१, रा. भेलसई, ता. खेड) हा तरुण या अपघातात जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र तांबे आणि हर्षद तांबे हे दोघे होंडा शाईन दुचाकी (एमएच ०८ ए.डब्ल्यू. ६५६१) घेऊन भेलसई येथून खेर्डीच्या दिशेने प्रवास करत होते. खांबेवाडी येथील वळणावर आले असता दुचाकीचालक रविंद्र याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालवल्याने ती रस्त्याच्या साईडपट्टीवरून थेट मोरीवरील पुलाच्या सिमेंट कठड्यावर जाऊन आदळली. या भीषण धडकेत रविंद्र यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेल्या हर्षद यांच्या डाव्या हाताच्या मनगटाला तसेच डोक्याला दुखापत झाली. या धडकेत दुचाकीचेही नुकसान झाले.
याप्रकरणी जखमी हर्षद संजय तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात मयत दुचाकीचालक रविंद्र तांबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४ आणि ३ (१)/१८१ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.


