(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील सिटी सर्व्हेलन्स प्रोजेक्ट अंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखभालीत गंभीर अनियमितता केल्याप्रकरणी खासगी आयटी कंपनीच्या संचालकांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शासनाची तब्बल ४३ लाख ३५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कथित फसवणूक १७ जानेवारी २०२३ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत रत्नागिरी शहर परिसरात झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी २४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६७/२०२५ नोंदवण्यात आला आहे. आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(२), ३१८(३), २२१ आणि २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात फिर्यादी म्हणून उमेश बाळासाहेब आव्हाड (वय ४६), पोलीस निरीक्षक, पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी यांनी तक्रार दाखल केली आहे. आरोपी म्हणून प्रोटोकॉल वन आयटी लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक हेमंत गोपाळ थवानी आणि कलदीप एराम यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.
तक्रारीनुसार, रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या अत्यंत महत्त्वाच्या सिटी सर्व्हेलन्स प्रोजेक्ट अंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नियमित देखभाल करणे आणि परवठा आदेशातील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधित कंपनीवर बंधनकारक होते. मात्र, आरोपी संचालकांनी जाणीवपूर्वक या अटींचा भंग केला. अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत ठेवण्यात आल्याने शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला आणि शासनाची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे रत्नागिरी शहरातील सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर परिणाम झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत असून, अन्य संबंधित बाबींचाही सखोल तपास केला जात आहे.

