(रत्नागिरी / प्रतिनिधी)
“मी संवेदनशील जिल्ह्यातून आलो असून रत्नागिरीसारख्या शांततेच्या जिल्ह्यातही शांतता कायम राखणे, हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे,” अशा ठाम शब्दांत रत्नागिरीचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपली भूमिका मांडली.
शनिवार, २४ मे रोजी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून रत्नागिरीत दाखल होत जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अंमली पदार्थांच्या साखळीविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला. “रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज विक्रीची साखळी पूर्णतः उद्ध्वस्त केली जाईल. अशा अवैध व्यवसायात गुंतलेल्यांना कोणतीही सूट मिळणार नाही,” असे बगाटे यांनी ठामपणे सांगितले.
आपल्या अनुभवाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, “मी 2021 ते 2023 दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. कोकणाची भौगोलिक व सामाजिक रचना मला परिचित आहे. याआधी मी रत्नागिरीत दोन वेळा आलो असून येथील परिस्थितीची मला चांगली जाणीव आहे. छत्रपती संभाजीनगरसारख्या गुन्हेगारीदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात काम केल्यानंतर रत्नागिरीत शांतता राखणे, ही माझी प्राथमिकता असेल.”
पोलीस दलाच्या कार्यशैलीबाबत आपली भूमिका मांडताना बगाटे म्हणाले, “पोलिसांनी सदैव फिट राहिले पाहिजे. जनतेशी योग्य संवाद साधणे, तक्रारदारांचे म्हणणे समजून घेणे, कामात पारदर्शकता आणि घटनांवर तत्काळ प्रतिसाद देणे ही जबाबदारी मी स्वतः पाळणार असून सर्व पोलीस अधिकाऱ्यांनीही ती पाळावी, यासाठी प्रयत्नशील राहीन.”

