.(रत्नागिरी /प्रतिनिधी)
अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या हातखंबा येथील ४० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र रामचंद्र डांगे (वय ४०, रा. हातखंबा डांगेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र डांगे यांना दारू पिण्याचे व्यसन होते. ११ नोव्हेंबर रोजी ते घरी असताना त्यांना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यावेळी त्यांच्या आई सीता डांगे यांनी त्यांना तातडीने हातखंबा येथील डॉ. भोसले यांच्याकडे उपचारासाठी नेले. मात्र, प्रकृतीच्या पुढील उपचारांची आवश्यकता असल्याने त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रात्री ९.५८ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची खबर त्यांचे चुलत भाऊ सुभाष डांगे यांनी पोलिसांना दिली.
याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक १०३/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पुढील वैद्यकीय व पोलीस प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.


