(संगमेश्वर / एजाज पटेल)
शास्त्रीपूल आंबेड-डिंगणी मुख्य रस्त्यावर भिरकोंड या ठिकाणी सी. एन. जी. गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक पुंडलिक भानू राठोड हा गंभीर जखमी झाला आहे, तर अमीर चंदू पवार याला किरकोळ दुखापत झाली आहे. ही घटना गुरुवार 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली असून संगमेश्वर पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुंडलिक राठोड वय वर्ष 40 वर्ष व अमीर चंदू पवार हे के. ए. 28 ई. डी 4839 हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीने डिंगणी -शास्त्रीपुल आंबेड मुख्य रस्त्यावरून जात असताना शास्त्रीपूल आंबेड च्या दिशेने येणाऱ्या एम. एच 09 जी. जे 3119 टाटा ट्रक ने भिरकोंड या ठिकाणी दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकची दुचाकीला बसलेली धडक एवढी जोरात होती की, दुचाकीसह दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यापासून काही अंतरावर गटारात पडले.
या अपघातात दुचाकीवरील पुंडलिक राठोड याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून येथील डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यात आले असून त्याच्या पायाला तीन ठिकाणी फ्रेक्चर असून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावे लागणार असल्याचे सांगितले. तर किरकोळ दुखापत झालेल्या अमीर पवार याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.
गॅस वाहतूक करणारा ट्रक चालक शुभम आत्माराम महाडिक वय वर्ष 28 राहणार, करंबेळे तालुका संगमेश्वर हा डिंगणी सी. एन. जी. पंपावर गॅस भरण्यासाठी जात असताना अपघात घडला. मात्र अपघातस्थळी गंभीर दुचाकीस्वरांच्या मदतीसाठी ट्रक चालक न थांबता तेथून तो निघून गेला असल्याचे समजते. मात्र या मार्गांवरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी सी. एन. जी. पंपावर अखेर थांबवले असे अपघातस्थळी जमा झालेल्या लोकांकडून बोलले जात होते. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी दाखल होऊन पंचनामा केला असून अधिक तपास सुरु आहे.

