(चिपळूण / रत्नागिरी)
कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागाच्या अलोरे येथील सिमेंट गोदामातून अॅल्युमिनियमची पत्रे आणि लोखंडी पाइप चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गणेश प्रकाश कदम (रा. कोळकेवाडी, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग, अलोरे येथील सिमेंट गोदामात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. गोदामाच्या पश्चिम दिशेकडील डाव्या बाजूस लावण्यात आलेली अल्युमिनियमची पत्रे तसेच गोदामातील लोखंडी पाइप परवानगीशिवाय चोरी करून नेण्यात आल्याचा आरोप आहे. चोरीस गेलेल्या मालामध्ये सुमारे ११ हजार रुपये किमतीची ८ बाय २.२५ फूट आकाराची ३९ अॅल्युमिनियमची पत्रे तसेच १२०० रुपये किमतीचे आठ फूट लांबीचे, दोन इंच व्यासाचे पाच लोखंडी पाइप यांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे १२ हजार २०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागातील चौकीदार प्रकाश जानू मोहिते (वय ५५, रा. कोळकेवाडी, ता. चिपळूण) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. संबंधित अधिकारी अभिजीत मनोहर पुतके हे घटनेच्या दिवशी रजेवर असल्याने तत्काळ गुन्हा दाखल करता आला नाही. ते रजेवरून हजर झाल्यानंतर चोरीबाबत पोलिसांकडे तक्रारीचा अर्ज देण्यात आला. या अर्जाच्या चौकशीनंतर मोहिते यांनी पोलिस ठाण्यात हजर राहून तक्रार दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अलोरे-शिरगाव पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


