(संगमेश्वर / एजाज पटेल)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. गेली अनेक वर्षे बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून, हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत या सामंत बंधूंनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याने जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
काही दिवसांपासून रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार १० वर्षांपेक्षा अधिक काळ संचालकपदावर असलेल्या जुन्या संचालकांना निवृत्त व्हावे लागणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे प्रस्थापित संचालकांसमोर पद गमावण्याचे संकट निर्माण झाले होते. मात्र, राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सहकार कायद्यानुसारच होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जुन्या संचालकांवरील निवृत्तीचे संकट टळले आहे. या कायदेशीर दिलाशामुळे विद्यमान संचालकांना पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी मिळाली असून त्यांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, बँकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी शिवसेनेकडूनही स्वतंत्र रणनीती आखली जात आहे. रामदास कदम यांनी यापूर्वीपासूनच बँकेच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता त्यांना पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांची राजकीय साथ मिळाल्याने शिवसेनेच्या गोटातील हालचालींना वेग आला आहे. सामंत बंधूंनी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची संस्था मानली जाते. बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध संस्था, सहकारी क्षेत्र आणि जनसंपर्कावर प्रभाव निर्माण करण्याचे राजकीय गणितही महत्त्वाचे ठरते. त्यामुळे जिल्हा बँकेवरील नियंत्रणाला राजकीयदृष्ट्याही मोठे महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून बँकेच्या निवडणुकीसाठी व्यापक रणनीती आखली जात असल्याचे चित्र आहे.
एका बाजूला जुन्या संचालकांना मिळालेला कायदेशीर दिलासा, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून सुरू झालेली जोरदार मोर्चेबांधणी यामुळे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची आगामी निवडणूक चांगलीच रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक बँकेच्या संचालक मंडळापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे.


