(संगमेश्वर / प्रतिनिधी)
सेंद्रिय शेतीचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवण्यासाठी जिल्हा परिषद मराठी शाळा, देवधामापूर सप्रेवाडी येथे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या हळद लागवड प्रकल्पाअंतर्गत यंदाही ‘हळद लागवड ते काढणी’ हा प्रत्यक्ष प्रात्यक्षिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
पंतप्रधान पोषण योजना अंतर्गत परसबाग प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना लागवडपूर्व मशागत, गादीवाफे तयार करणे, बियाणे लागवड, सेंद्रिय खतांचा वापर आदी सर्व टप्प्यांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. हळद काढणीच्या प्रात्यक्षिकातही विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. हळद लागवड ते काढणी या संपूर्ण प्रवासात निरीक्षण, अनुभव व कृतीशील शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शेतीचे अनेक पैलू आत्मसात केले. हळदीचे औषधी गुणधर्म, आपल्या संस्कृतीतील तिचे अनन्यसाधारण महत्त्व, तसेच हळदीतील ‘कुरकुमीन’ या घटकाचे आरोग्यदायी फायदे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून समजले. ‘सेलम’ या वाणाची हळद पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने पिकवून नैसर्गिक प्रक्रिया करून तयार करण्यात आलेली हळदपावडर शालेय पोषण आहारात वापरली जात असल्याचे विशेष उल्लेखनीय ठरले.
पुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष जीवनाशी जोडणारा हा उपक्रम शाळेची एक वेगळी ओळख निर्माण करणारा ठरला असून परिसरात त्याचे कौतुक होत आहे. हा उपक्रम मुख्याध्यापक श्री. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली, शिक्षक श्री. सतीश वाकसे, शालेय पोषण व्यवस्थापिका सौ. वेदिका माईन, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश सप्रे व उपाध्यक्षा सुहासिनी भातडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

