( देवरुख )
संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक (शिंदेवाडी) येथे घरातील कपाटातून ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, चोरट्याने कोणतेही कुलूप न तोडता कपाटातच ठेवलेल्या चावीचा वापर करून हा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी संतोष दौलत पाल्ये (वय ५६) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी २४ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ या कालावधीत घडली. फिर्यादींच्या निवे बुद्रुक येथील सामाईक घरात कपाटाच्या लॉकरची चावी आतच ठेवलेली होती. चोरट्याने याचाच फायदा घेत कपाट उघडून सुमारे दोन तोळ्यांचा ४० हजार रुपयांचा सोन्याचा हार आणि दोन तोळ्यांची ३० हजार रुपयांची सोन्याची चैन असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
घटनेत घरात कोणतीही तोडफोड किंवा जबरी चोरीच्या खुणा आढळून न आल्याने, घरातील वस्तू व चाव्यांची माहिती असलेल्या माहितगार व्यक्तीचाच सहभाग असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवस शोध घेतल्यानंतर अखेर २७ मार्च रोजी पाल्ये यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत परिसरातील संशयितांची चौकशी सुरू केली असून, देवरुख पोलीस पुढील तपास करत आहेत.

