(रत्नागिरी / वार्ताहर)
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय योजना आणि आवश्यक प्रमाणपत्रांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ कुवारबाव ग्रामपंचायत, उत्कर्षनगर, रत्नागिरी येथे सोमवारी आयोजित करण्यात आले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या वेळी लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये जातीचे दाखले, नॉन-क्रीमी लेअर प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, रेशन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, प्रॉपर्टी कार्ड, मतदान ओळखपत्र आणि सातबारा उतारे आदी कागदपत्रांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदय गायकवाड, रत्नागिरीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, अपूर्वा कारंडे, बी. टी. मोरे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ तसेच भटक्या जाती व विमुक्त जमाती प्रवर्गातील लाभार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर निवे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर केले. यावेळी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी शासनाच्या वतीने भटके-विमुक्त समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, सहाय्यक संचालक उदय गायकवाड तसेच बी. टी. मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी समीक्षा बोडेकर हिने जिल्हा परिषदेच्या परीक्षेंतर्गत नासा, अमेरिका संबंधित उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला लाभार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


