(देवळे / प्रकाश चाळके)
लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत तालुक्यातील आरोग्य सेवांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांतील सुविधा बळकट करणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे, माता-बाल आरोग्य, कुपोषण निर्मूलन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण मोहीम, स्वच्छता अभियान आणि आरोग्य जनजागृती कार्यक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी सर्व विभागांनी प्रभावी समन्वय राखून नागरिकांना अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक विभागाने जबाबदारीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेत प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आरोग्य सेवांमधील अडचणी, पायाभूत सुविधांची गरज, रुग्णसेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या भागातील आरोग्यविषयक समस्या मांडत ग्रामीण भागासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे, मनुष्यबळ, रुग्णवाहिका सेवा, नियमित आरोग्य शिबिरे आणि जनजागृती मोहिमा राबविण्याची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांनी या मागण्यांची दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीच्या शेवटी आमदार किरण सामंत यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि प्रत्येक गावापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले.
यावेळी माजी आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, लांजा पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, संगमेश्वर पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये, लांजा नगराध्यक्षा सावली कुरूप, राजापूर तहसीलदार विकास गबरे, लांजा तहसीलदार प्रियांका डोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली असून, उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी आणि विभागप्रमुखांनी समन्वयातून आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

