(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जांभारी येथील कुणबीवाडीमध्ये जिंदाल कंपनीच्या ऊर्जा प्रकल्पाच्या उच्चदाब विद्युत वाहिनीमुळे नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात स्थानिक रहिवासी सुवर्णा सोनू पागडे यांनी आपली व्यथा मांडल्यानंतर शिवसेना उपविभागप्रमुख अजीमभाई चिकटे आणि जांभारीचे सरपंच आदेश पावरी यांनी तत्काळ दखल घेत कंपनीकडे पाठपुरावा केला.
पागडे यांच्या घरावरून विद्युत वाहिनी गेल्यामुळे घरामध्ये वारंवार स्पार्किंग होणे, विजेचा धक्का बसण्याचा धोका निर्माण होणे, तसेच शेतामध्येही विद्युत प्रवाहाचा त्रास जाणवत असल्याची तक्रार करण्यात आली होती.
तक्रारीची गंभीर दखल घेत अजीमभाई चिकटे यांनी जिंदाल कंपनीचे अधिकारी नरेश विलणकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर कंपनीचे अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ व्यवस्थापक (ट्रान्समिशन) वैभव संसारे हेही उपस्थित होते. पाहणीनंतर नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून समस्या लवकरात लवकर सोडविण्यात येईल, असे आश्वासन जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले.
या प्रकरणात तातडीने पाठपुरावा करून कंपनीकडून पाहणी घडवून आणल्याबद्दल शिवसेना उपविभागप्रमुख अजीमभाई चिकटे आणि सरपंच आदेश पावरी यांच्या कार्यतत्परतेचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

