(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील मौजे पांचाबे, गायकवाडवाडी येथे रस्त्याच्या बाजूला नर बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) ही घटना उघडकीस आली. पांचाबे येथील नागरिक श्री. अविनाश भिकाजी टाकळे यांनी दूरध्वनीवरून वन विभागाला याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. सदर बिबट्या नर असून त्याचा मृत्यू साधारणतः ९ ते १० दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला. दीर्घ कालावधी लोटल्याने बिबट्याचा मृतदेह अत्यंत सडलेल्या व कुजलेल्या अवस्थेत होता.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पशुधन विकास अधिकारी (कडवई) यांनीही घटनास्थळी पोहोचून मृत बिबट्याची पाहणी व वैद्यकीय तपासणी केली. प्राथमिक तपासणीत बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असावा, असा निष्कर्ष नोंदविण्यात आला. त्यानंतर वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घटनास्थळीच लाकडाची चिता रचून बिबट्याच्या अवयवांचे शासकीय नियमानुसार दहन करण्यात आले.
ही कारवाई विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वनाधिकारी (रत्नागिरी) श्री. विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संगमेश्वर देवरुखचे वनपाल श्री. सागर गोसावी, आरवलीचे वनरक्षक श्री. सुरज तेली, साखरपाचे वनरक्षक श्री. सहयोग कराडे, फुणगुसचे वनरक्षक श्री. आकाश कडूकर यांच्यासह कुटगिरीचे पोलिस पाटील, प्राणीमित्र श्री. प्रणित टाकळे आणि श्री. शंकर जागुष्टे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
परिसरात अशा प्रकारची घटना घडल्यास किंवा कोणताही वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ वन विभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन परिमंडळ वन अधिकारी (संगमेश्वर देवरुख) श्री. सागर गोसावी यांनी केले आहे.


