(रत्नागिरी)
वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत कोल्हापूर आणि रत्नागिरी सीमा शुल्क विभागाने दोन बिबट्यांच्या कातड्यांसह चार जणांना अटक केली आहे. रविवारी (२९ मार्च २०२६) पहाटे कोल्हापूर शहरालगतच्या महामार्गावर ही धडक कारवाई करण्यात आली.
गुप्त माहितीवरून सापळा
सीमा शुल्क विभागाच्या ‘प्रिव्हेंटिव्ह अँड इंटेलिजन्स’ शाखेला बिबट्यांच्या कातड्यांची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार अधीक्षक हिमांशु शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले. पथकाने संशयित असलेल्या मरून रंगाच्या Kia Seltos कारला अडवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान कारमध्ये दोन बिबट्यांची कातडी आढळून आली. यासह गुन्ह्यात वापरलेली कार, काही महत्त्वाचे दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोन जण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील आहेत, तर उर्वरित आरोपी सातारा आणि लातूर जिल्ह्यांतील रहिवासी आहेत. सर्व आरोपींना कोल्हापूरच्या वडगाव न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या मोहिमेत अधीक्षक लक्ष्मीकांत भाटकर, संदीप कौशिक, निरीक्षक राजेश लाडे, रोहित भालेकर, रितिक कुंभलवार, रमेश गुप्ता, अंकित सिन्हा, तसेच हेड हवालदार संजय जाधव आणि हवालदार अभिषेक यादव यांचा सहभाग होता.
वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देत नागरिकांना अशा तस्करीबाबत माहिती मिळाल्यास ७२१९२१२३०४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक सीमा शुल्क आयुक्त संदीप कृष्णा यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

