(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी रत्नागिरी पोलिस दलाने तंत्रज्ञानाचा वापर करत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वाहनांमध्ये अत्याधुनिक जीपीएस प्रणाली बसवण्यात आली असून ही वाहने आता जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अपर पोलीस अधीक्षक यांच्या थेट देखरेखीखाली राहणार आहेत.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून ३ सप्टेंबर २०२५ रोजी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रणालीमुळे जिल्ह्यात गस्त घालणाऱ्या सर्व वाहनांवर रिअल टाईम मॉनिटरिंग करणे शक्य होणार आहे. कोणतीही घटना घडल्यास सर्वात जवळील वाहन घटनास्थळी तात्काळ पोहोचवता येणार असून त्यामुळे पोलिसी प्रतिसादाचा वेग लक्षणीय वाढणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक कार्यक्षम गस्त करणे शक्य होणार आहे, तसेच वाहनांचा वापर जवाबदारीपूर्वक आणि पारदर्शक पद्धतीने होत असल्याची खात्रीही मिळणार आहे.
गुन्हे रोखणे, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे आणि नागरिकांना वेळेत मदत करणे या सर्व बाबींमध्ये या तंत्रज्ञानाचा पोलिस दलाला मोठा आधार मिळणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रत्नागिरी पोलिसांनी उचललेले हे पाऊल ठोस आणि स्वागतार्ह ठरणार आहे.

