( रत्नागिरी /प्रतिनिधी )
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी परिवहन विभाग आणि पोलिस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशांनुसार, १ सप्टेंबर रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा संघटना आणि बस वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पोलीस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक झाली.
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता, सर्व वाहनधारकांनी वाहनांची कागदपत्रे वैध असल्याची खात्री करावी, अशा स्पष्ट सूचना बैठकीत देण्यात आल्या. रिक्षाचालकांनी रिक्षा थांब्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशा शिस्तबद्ध पद्धतीने वाहने उभी करावीत. तसेच प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणे, त्यांच्याशी उद्धटपणे वागणे किंवा वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे टाळावे, असे बजावण्यात आले. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील रेल्वेस्थानके तसेच प्रमुख रिक्षा थांब्यांवर परिवहन विभागाने निश्चित केलेल्या रिक्षा भाडेदरांचे फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना निर्धारित भाड्याची माहिती सहज उपलब्ध होणार असून, मनमानी भाडेवसुलीला आळा घालण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालक आणि मालकांनाही प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. बसमधील आपत्कालीन दरवाजा, अग्निशामक यंत्रणा आणि प्रथमोपचार पेटी सुस्थितीत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी बसमालकांची राहणार आहे. चालकाने मद्यप्राशन करून अथवा धोकादायक पद्धतीने बस चालवू नये, याची दक्षता घेण्याचेही स्पष्ट निर्देश देण्यात आले. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित चालकासह बसमालकावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी बसच्या सुटण्याच्या वेळांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही बस वाहतूकदारांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारू नये आणि परिवहन विभागाने निश्चित केलेल्या भाडेदरांचे पालन करावे, असे बजावण्यात आले.
या बैठकीस अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, मोटार वाहन निरीक्षक अरविंद फुलारी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण रणदिवे, महामार्ग पोलीस निरीक्षक दिपाली उदय जाधव, जि.वि.शा.चे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक संजय कांबळे यांच्यासह रिक्षा व बस वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तक्रारीसाठी परिवहन विभागाचा ई-मेल
रिक्षा किंवा बस वाहतूकदारांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्यास अथवा प्रवाशांशी उद्धट वर्तन केले जात असल्यास नागरिकांनी संबंधित वाहनाचा क्रमांक, प्रवासाचा तपशील आणि अन्य आवश्यक माहिती नमूद करून dyrto.08-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार करावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक कोकणात येतात. या पार्श्वभूमीवर वाहतूकदारांनी नियमांचे पालन करावे, तर नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
ही बातमी वाचा : गणेशोत्सवात गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन ‘अलर्ट’; रिक्षा भाड्याचे दरपत्रक अनिवार्य

