(मुंबई / वृत्तसंस्था)
देशातील युवा शक्तीला रोजगारक्षम करण्यासाठी शिक्षणासोबत कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगार यांची सांगड घालणे आवश्यक आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून बदलत्या तंत्रज्ञानानुसार एआय, सेमीकंडक्टर आणि क्वांटम कॉम्प्युटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये सातत्याने ‘अपस्किलिंग’ करून नवीन कौशल्ये आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. जगातील २८ हून अधिक देशांमध्ये मनुष्यबळाची मोठी मागणी असून, महाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित ‘पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्या’चा कोकण व नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पणन मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रो. हेमलता बागला, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त डॉ. अमित सैनी, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, सृजन ट्रस्टचे अध्यक्ष दीपक मुकादम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यभरातून ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष प्रणालीद्वारे हजारो विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे रोजगार मेळाव्याला शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहीदा परमाणिक यांना क्रेवा कॅपीटल सर्व्हिसेस प्रायवेट लिमीटेड, बेलापूर आणि कांती शंभू चव्हाण यांना क्रेवा कॅपीटल सर्व्हिसेस प्रायवेट लिमीटेड, कुर्ला या कंपन्यांकडून देण्यात आलेली नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण व नाशिक विभागातील तरुणांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला ‘अंत्योदय’ आणि ‘एकात्म मानव दर्शन’ हा विचार समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासावर आधारित असून, त्याच विचारातून शासनाचे कामकाज सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
देशामध्ये शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून मानव संसाधनाची निर्मिती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याच्या आधारावर २०४७चा विकसित भारत घडविण्याचे उद्दिष्ट आहे. गरीबीमुक्त, बेरोजगारीमुक्त आणि रोगमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या त्रिसूत्रीवर आधारित व्यवस्था उभी करावी लागेल. देशातील ६५ टक्के लोकसंख्या कार्यक्षम युवाशक्ती आहे. एका बाजूला उद्योजकांना कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे, तर दुसऱ्या बाजूला तरुणांना रोजगाराची गरज आहे. या दोन्ही घटकांना जोडणारा दुवा म्हणून रोजगार मेळावे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने युवकांनी सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करावीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
रोजगार मेळाव्यासाठी १ लाखांहून अधिक नोंदणी झाल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार यंदा केवळ आयटीआयमधील विद्यार्थ्यांपुरते मर्यादित न राहता सर्व स्तरांतील तरुणांसाठी प्रत्येक तालुक्यात किमान तीन लहान रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. रोजगार मिळविण्यासाठी उमेदवारांना सात दिवसांचे मोफत पूर्व-रोजगार प्रशिक्षण देण्यात आले असून, आतापर्यंत ६१ हजार मुला-मुलींनी हे प्रशिक्षण घेतले आहे. या मेळाव्यासाठी १ लाखांपेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली असून, किमान ७० टक्के तरुणांना रोजगार किंवा स्वरोजगाराशी जोडल्याशिवाय थांबणार नसल्याचे लोढा यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रोजगारक्षम शिक्षणाची आवश्यकता अधोरेखित केली. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कौशल्य विकास विभागाच्या समन्वयाने काम करत असून, पदवीधरांची संख्या वाढेल त्याप्रमाणे रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. युवकांना केवळ रोजगार मेळाव्यात सहभागी करून घेणे हा उद्देश नसून, त्यांना मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी सक्षम करणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुलाखतपूर्व प्रशिक्षणासह व्यक्तिमत्त्व विकास, सॉफ्ट स्किल्स, संवाद कौशल्य आणि व्यवस्थापन कौशल्य यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राला ‘ग्लोबल एम्प्लॉयमेंट हब’ बनविण्याचा प्रयत्न असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. महाराष्ट्राने आशियातील अव्वल गुंतवणूक केंद्र आणि देशाची ‘स्टार्टअप कॅपिटल’ म्हणून ओळख निर्माण केली आहे. तरुणांना राज्याबरोबरच जगभरात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यास आवश्यक भाषा व कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना परदेशात पाठविण्याची तयारी शासनाने केली आहे. ‘मोबिलीटी’ प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी आणि पणन क्षेत्रातही अडीच हजार कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योग व रोजगाराशी जोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकण व नाशिक विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १५०० पेक्षा अधिक उद्योजक व नियोक्ते तसेच एक लाखांपेक्षा अधिक रोजगार इच्छुक युवक-युवतींनी रोजगार महाकुंभासाठी नोंदणी केली आहे. सहभागी उद्योजकांकडून २५,००० पेक्षा अधिक रोजगाराच्या संधींसाठी रिक्त पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्हानिहाय शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्थानिक प्रशासन आणि इतर संस्थांच्या समन्वयातून उमेदवार व नियोक्त्यांमध्ये समन्वय साधण्यात आला आहे. या उपक्रमाला जिल्हा प्रशासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, कामगार विभाग, उद्योग विभाग, पणन विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विद्यापीठे आणि औद्योगिक संघटनांचे सहकार्य लाभले आहे.
महिलांच्या रोजगार सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठात महिलांसाठी स्वतंत्र विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योग, कंपन्या आणि सेवा क्षेत्रातील आस्थापनांचा सहभाग निश्चित करण्यात आला होता. विविध ३६ उद्योजकांनी सहभाग नोंदविला. तसेच स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी विविध शासकीय महामंडळांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉलही उपलब्ध करून देण्यात आले.


