(रत्नागिरी /प्रतिनिधी)
महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करून समुद्रात अवैध पर्ससीन मासेमारी करणाऱ्या नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. गेल्या चार-पाच दिवसांत तीन पर्ससीन नौकांवर कारवाई करण्यात आली असून, दोन नौका जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे अवैध मासेमारी करणाऱ्या नौकामालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
विजयदुर्ग येथील समुद्रात २७ सप्टेंबर रोजी सकाळी तीन वाव पाण्यात अवैध पर्ससीन मासेमारी सुरू असल्याचे आढळून आले. महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमाचे उल्लंघन करत मासेमारी करणारी रत्नागिरी येथील नौकामालक अर्शद लतीफ पावसकर यांच्या मालकीची नौका मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने जप्त केली. नौकेची तपासणी केली असता त्यामध्ये २० परप्रांतीय खलाशी आढळून आले. यानंतर २८ सप्टेंबर रोजी तारामुंबरी-कुणकेश्वर समुद्र परिसरात अवैध पर्ससीन मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी येथील ‘इब्राहिम युसूफ’ या नौकेवर कारवाई करण्यात आली. संबंधित नौका जप्त करून ती देवगड बंदरात आणण्यात आली. या नौकेमध्येही २० परप्रांतीय खलाशी आढळून आले.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड येथील अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने केली. दोन्ही नौकांनी महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियम, १९८१ मधील तरतुदींचे उल्लंघन करून अवैध पद्धतीने मासेमारी केल्याचे कारवाईदरम्यान निष्पन्न झाले. संबंधितांविरोधात अधिनियमांतर्गत कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
कारवाईचा धडाका; चार-पाच दिवसांत तीन नौका
विशेष म्हणजे, यापूर्वीही चार-पाच दिवसांपूर्वी एका पर्ससीन नौकेवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अल्पावधीत तीन पर्ससीन नौकांवर कारवाई झाल्याने अवैध मासेमारीविरोधातील मत्स्यव्यवसाय विभागाची मोहीम चर्चेत आली आहे. स्थानिक पारंपरिक रापण संघाने यापूर्वीच परवाना अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन अवैध पर्ससीन मासेमारीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर झालेल्या या कारवाईमुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
‘हरिकृपा-१’ने कारवाईच्या भीतीने काढला पळ
दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी देवगड परिसरात ‘हरिकृपा-१’ ही नौकाही अवैध पर्ससीन मासेमारी करत असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाच्या निदर्शनास आले. विभागाची कारवाई करणारी नौका त्या दिशेने येत असल्याचा सुगावा लागताच ‘हरिकृपा-१’ने घटनास्थळावरून पळ काढला. संबंधित नौकेविरोधातही महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमांतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


