(मुंबई / वृत्तसंस्था)
सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई–मडगाव आणि मुंबई–नागपूरदरम्यान ८ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगावदरम्यान ४, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूरदरम्यान ४ विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगावदरम्यान धावणारी गाडी क्रमांक 01029 ही साप्ताहिक विशेष गाडी २ ऑक्टोबर २०२६ (शुक्रवार) आणि ४ ऑक्टोबर २०२६ (रविवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००.२५ वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी १५.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01030 ही विशेष गाडी २ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर रोजी मडगाव येथून १६.०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी येथे थांबे असतील. या विशेष गाडीला ४ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ११ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी तसेच २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूरदरम्यान गाडी क्रमांक 02141 ही साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटून त्याच दिवशी १५.३५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 02142 ही २ ऑक्टोबर आणि ४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून १६.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ०९.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी (केवळ गाडी क्रमांक 02142), नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. या विशेष गाडीची संरचनाही ४ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ११ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी असेल.
गाडी क्रमांक 01029, 02141 आणि 02142 साठी आरक्षण १ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांसाठी युटीएस प्रणालीद्वारे तिकीट घेता येणार आहे. प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी ‘रेलवन’ ॲपचाही वापर करता येईल.
विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील सविस्तर वेळापत्रकासाठी भारतीय रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा एनटीइएस ॲपचा वापर करावा.
हे प्रसिद्धीपत्रक मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई यांनी जारी केले आहे.


