(देवळे / प्रकाश चाळके)
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. अनुष्का संदीप पर्शराम हिची दिल्ली येथे होणाऱ्या ‘कॅम्पस ते संसद’ कार्यक्रमांतर्गत नवीन संसद भवन भेटीसाठी निवड झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी निवड झालेली ती विद्यार्थिनी ठरली आहे.
राज्यसभेचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव श्री. विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून ‘कॅम्पस ते संसद’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन संसद भवनासह विविध महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्याची तसेच लोकशाही व्यवस्थेची माहिती प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी मिळते.
या उपक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयांमधून लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यांत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. देवरुख महाविद्यालयातून ५० विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यानंतर महाविद्यालयाच्या आबासाहेब व कमलाबाई सरदेशपांडे ग्रंथालयात घेण्यात आलेल्या लेखी प्रश्नमंजुषेतून पाच विद्यार्थ्यांची अंतिम मुलाखतीसाठी निवड झाली. आयोजकांकडून मुंबईतून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीनंतर कु. अनुष्का पर्शराम हिची दिल्ली भेटीसाठी निवड करण्यात आली.
यावर्षीच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्रातील ३१ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कु. अनुष्का पर्शराम हिला संसद भवन भेटीची संधी मिळाली आहे. आठवडाभराच्या या अभ्यास कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध स्थळांना संशोधन भेटी, राष्ट्रपती भवन, राष्ट्रीय युद्ध स्मारक आदी ठिकाणांना भेट देण्याबरोबरच महत्त्वाच्या आस्थापनांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
या निवड प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रा. स्नेहलता पुजारी, प्रा. संदीप मुळ्ये आणि प्रा. शिवराज कांबळे यांनी विशेष मार्गदर्शन केले. अनुष्काच्या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनुष्काचे अभिनंदन करून तिच्या अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.


