(आंबा / रत्नागिरी)
गेल्या दोन आठवड्यांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतूक व्यवस्थेलाही बसला आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाटात काही ठिकाणी रस्त्याला मोठ्या भेगा पडल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घातली आहे.
आंबा घाटातील रस्ता धोकादायक स्थितीत असल्याची माहिती मिळताच लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आपल्या नियोजित दौऱ्यात बदल करून तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पाहणीदरम्यान रस्त्यावर पडलेल्या भेगा, पावसामुळे झालेली जमिनीची हालचाल आणि रस्ता खचण्याची संभाव्य ठिकाणे याची पाहणी करण्यात आली. आंबा घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.
या गंभीर परिस्थितीबाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासोबत आज सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि अन्य संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून पुढील उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. रस्त्याच्या सुरक्षिततेबाबतचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक दुरुस्ती, वाहतुकीचे नियोजन तसेच पर्यायी मार्गांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कायमस्वरूपी उपाययोजनांची नागरिकांची मागणी
आंबा घाटातील रस्त्याला पडलेल्या भेगांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळणे, माती खचणे आणि रस्त्याचे नुकसान होण्याच्या घटना वाढत असल्याने प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या आंबा घाटातील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे तांत्रिक अहवालानंतर प्रशासनाकडून कोणते निर्णय घेतले जातात, याकडे वाहनचालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

