(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून माहितीच्या अधिकारात मागविण्यात आलेली माहिती तब्बल ३५ दिवस उलटूनही देण्यात आलेली नसल्याचा आरोप पत्रकार संतोष पोटफोडे यांनी केला आहे. माहिती देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असून माहिती दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेली माहिती वेळेत न देणे हा कायद्याचा भंग असून संबंधित माहिती अधिकार अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, तसेच नियमानुसार प्रतिदिन २५० रुपये दंड आकारण्यात यावा, अशी मागणी पोटफोडे यांनी केली आहे.
दहा दिवसांपूर्वी साखरपा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक तसेच माहिती अधिकार अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र अशा शिबिरांत नागरिकाभिमुख प्रशासनाची भाषा केली जाते, पण प्रत्यक्षात माहिती देण्याबाबत उदासीनता दिसून येत असल्याची टीका पोटफोडे यांनी केली.
साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती अधिकाराबाबत लावण्यात आलेली पाटी केवळ शोभेची वस्तू बनली असून, सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यास प्रशासन असमर्थ ठरत असेल तर अशा अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून कारभारात सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काही कर्मचारी कोणतेही नियंत्रण नसल्याप्रमाणे वागत असून, शासकीय कार्यक्रमांमध्ये स्वतःची पाठ थोपटण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली होती. मात्र कारवाई तर दूरच, कोणतीही सुधारणा दिसून येत नसून एकमेकांना वाचवण्याचाच प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणी जिल्हा प्रशासन तसेच आरोग्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल करणार असून, सत्य बाहेर आणल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशाराही पत्रकार संतोष पोटफोडे यांनी दिला आहे. तसेच येत्या काही दिवसांत आणखी माहिती माहिती अधिकारातून मागविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

