(संगमेश्वर / प्रतिनिधी)
कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर देवरूख येथे वास्तव्यास असलेल्या चैत्राली सुरेश मुळ्ये-जोशी यांनी ‘दि फ्युचर युनिव्हर्सिटी’च्या ज्योतिषशास्त्र आणि लाल किताब विषयातील ‘आचार्य’ अभ्यासक्रमात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल देवरूख तसेच रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
‘दि फ्युचर युनिव्हर्सिटी’च्या या अभ्यासक्रमांतर्गत झालेल्या सहा परीक्षांमध्ये चैत्राली मुळ्ये-जोशी यांनी ६०० पैकी तब्बल ५९५ गुण मिळवले. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत त्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवत आपली गुणवत्ताही सिद्ध केली.
घर-संसार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच अभ्यासासाठी वेळ देत त्यांनी हे यश संपादन केले. त्यामुळे त्यांच्या यशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मेहनत, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे चैत्राली मुळ्ये-जोशी यांचे यश प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
ज्योतिषशास्त्र आणि लाल किताब या विषयांचा सखोल अभ्यास करत सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि हितचिंतकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. देवरूखसह रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल भावना व्यक्त करताना चैत्राली मुळ्ये-जोशी म्हणाल्या, “आपल्या मेहनतीला कुटुंबाची साथ, गुरुजनांचे आशीर्वाद आणि श्रद्धेचे बळ मिळाले. त्यामुळे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आणि या यशाने माझ्या प्रयत्नांना एक सुंदर किनार लाभली. मात्र, ज्योतिषशास्त्राचे शिक्षण घेण्यामागचा माझा उद्देश केवळ लोकांना भविष्य सांगणे हा नाही. त्यांच्या आयुष्यातील अडचणी, समस्या आणि प्रश्न समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांना त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मदत करता यावी, हा माझा प्रयत्न आहे. माझ्यासाठी ज्योतिषशास्त्र म्हणजे केवळ भविष्य जाणून घेण्याचे साधन नसून, योग्य दिशा दाखवून शक्य तितक्या सकारात्मक पद्धतीने भविष्य घडविण्यासाठी मदत करण्याचे माध्यम आहे.”


