(देवरुख / वार्ताहर)
भाट्ये नारळ संशोधन केंद्राच्या सहकार्याने व अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत नाबार्ड पुणे आणि एमसीडीसी पुणे यांच्या विद्यमाने संगमेश्वर तालुका ऍग्रो स्टार फार्म फ्रेश शेतकरी उत्पादक कंपनीच्यावतीने महिला शेतकऱ्यांना बुधवारी रोपांचे वाटप करण्यात आले. महिला किसान दिवसाचे औचित्य साधून कंपनीच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी नारळ, सुपारी व दालचिनी रोप वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन कंपनीचे चेअरमन विलास शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “महिला शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तिच्या हातात शेतीचे साधन दिल्यास ती कुटुंबाबरोबर संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा पाया रचते असे सांगितले.
या कार्यक्रमात भाट्ये नारळ संशोधन केंद्र, रत्नागिरी येथील कृषी तज्ञ डॉ. संतोष वानखेडे व डॉ. किरण माळशे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून नारळ, सुपारी आणि दालचिनी पिकांच्या लागवड तंत्रज्ञान, रोप व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान ८० हून अधिक प्रत्येक महिला शेतकरी भगिनींना
नारळाची ११ रोपे, सुपारीची ३ रोपे आणि दालचिनीची २ रोपे अशी एकूण १६ दर्जेदार रोपे वाटप करण्यात आली.
या उपक्रमाचा उद्देश महिलांना शाश्वत शेतीकडे वळवून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा असून, या पिकांद्वारे महिलांना दीर्घकालीन उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमास टेक्नोसर्व एन जी ओचे अक्षय माने, संग्राम नांगरे, साहिल गांधी, कंपनीच्या कुमारी प्रणाली कांबळे तसेच कृषी विभाग, देवरुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संयोजन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पाटील यांनी केले. महिला किसान दिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम महिलांच्या आत्मनिर्भरतेचा आणि शाश्वत शेतीच्या दिशेने टाकलेले एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.
फोटो – महिला शेतकऱ्यांना रोपांचे वाटप करताना विलास शेलार, संतोष वानखडे, किरण माळसे आदी.

