(रत्नागिरी / प्रतिनिधी)
खासगी प्रवासी वाहतुकीला आळा घालून गावागावांत पोहोचलेल्या ‘लालपरी’कडे प्रवाशांचा ओढा वाढविण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे एसटीकडे पुन्हा प्रवाशांचा कल वाढत असताना रत्नागिरी विभाग मात्र अपुऱ्या बसगाड्यांच्या समस्येला सामोरा जात आहे. मंडणगडपासून राजापूरपर्यंतच्या नऊ आगारांतून दररोज तब्बल ४,२०० ते ४,५०० फेऱ्या चालविताना सव्वा दोन ते अडीच लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेल्या ताफ्याच्या तुलनेत तब्बल १२५ बसेसची कमतरता भासत असल्याने एसटीच्या दैनंदिन वेळापत्रकावर त्याचा परिणाम होत आहे.
रत्नागिरी विभागाची एसटी ग्रामीण भागाच्या दळणवळणाची प्रमुख आधारवाहिनी मानली जाते. वाडी-वस्तीपर्यंत पोहोचलेल्या ‘लालपरी’मुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि बाजारपेठेशी जोडणारी वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली आहे. मात्र, उपलब्ध बसगाड्यांवर वाढत्या प्रवासी संख्येचा ताण पडत असल्याने अनेकदा वेळापत्रक सांभाळताना प्रशासनाची दमछाक होत आहे. सन २०१९ मध्ये रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात तब्बल ८५४ बसेस होत्या. कालांतराने जुन्या गाड्या सेवेतून बाद झाल्याने सध्या विभागाकडे केवळ ६९० बसेस उपलब्ध आहेत. परिणामी, पूर्वीच्या तुलनेत गाड्यांची संख्या घटली असतानाही प्रवासी वाहतुकीचा भार कायम आहे. बसगाड्यांची कमतरता जाणवत असल्याने दैनंदिन फेऱ्या, वेळापत्रक आणि प्रवाशांना उपलब्ध होणारी सेवा यावर त्याचे पडसाद उमटत आहेत.
केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार एसटीसह व्यावसायिक वाहनांचे आयुर्मान १५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. निर्धारित आयुर्मान किंवा किलोमीटरची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर संबंधित वाहने सेवेतून बाद करून भंगारात काढली जातात. रत्नागिरी विभागातील २४९ बसेस स्क्रॅप करण्यात आल्याने विभागाच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. जुन्या गाड्यांची जागा नव्या बसेसने तातडीने भरून काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीकडून प्रवाशांच्या अपेक्षा वाढत असताना उपलब्ध गाड्यांची संख्या आणि प्रत्यक्ष वाहतुकीचा भार यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्या बसेसची उपलब्धता वाढवून ताफ्याची क्षमता मजबूत करण्याचे आव्हान रत्नागिरी विभागासमोर आहे.
ई-शिवाईसाठी चार्जिंग सेंटरची प्रतीक्षा
रत्नागिरी विभागात सध्या २६ ई-शिवाई बसेस असून त्या दापोली आगारातून धावत आहेत. रत्नागिरी आगारातील ई-बसेसच्या चार्जिंग सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम डिसेंबरअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा असून त्यानंतर रत्नागिरी आगारातही ई-शिवाई बसेस दाखल होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
‘जिजाऊ’ बसेसची मागणी वाढली
महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या राजमाता जिजाऊ बसेस प्रवाशांसाठी अत्याधुनिक आणि तुलनेने अधिक आरामदायी ठरत आहेत. या बसेसमध्ये ५६ प्रवासी आसनांची क्षमता असून सर्वसाधारण एसटी बसच्या तुलनेत १६ आसने अधिक आहेत. सध्या रत्नागिरी विभागाच्या ताफ्यात ८३ जिजाऊ बसेस दाखल झाल्या आहेत. वाढती प्रवासी मागणी आणि ताफ्यावरील वाढता ताण लक्षात घेता विभागाने आणखी १५० जिजाऊ बसेसची मागणी केली आहे.


