(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कोकण रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी स्वयंचलित तिकीट विक्री यंत्र अर्थात ‘एटीव्हीएम’ (ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीन) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सण-उत्सव तसेच सुट्टीच्या कालावधीत स्थानकावर वाढणारी प्रवाशांची गर्दी आणि तिकीट खिडक्यांवरील ताण लक्षात घेता ही सुविधा प्रवाशांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे.
रत्नागिरी स्थानकावर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा सुरू असते. विशेषतः गणेशोत्सव, दिवाळी तसेच अन्य सणांच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांगा लागण्याचे प्रकार घडतात. ऐनवेळी स्थानकात दाखल झालेल्या प्रवाशांना गर्दीमुळे तिकीट काढण्यासाठी वेळ लागण्याची आणि त्यातून गाडी चुकण्याची धाकधूकही असते. या पार्श्वभूमीवर एटीव्हीएम सुविधा प्रवाशांच्या वेळेची बचत करणारी ठरणार आहे. या स्वयंचलित यंत्राद्वारे अनारक्षित तसेच प्लॅटफॉर्म तिकीट सहजपणे काढता येणार आहे. तिकीट खरेदीसाठी प्रवाशांना स्क्रीनवर आवश्यक पर्याय निवडून गंतव्यस्थान निश्चित करता येईल आणि त्यानंतर तिकीट मिळवता येईल. त्यामुळे तिकीट खिडकीवर ताटकळत उभे राहण्याची आवश्यकता कमी होणार आहे.
एटीव्हीएममुळे तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याबरोबरच डिजिटल व्यवहारालाही चालना मिळणार आहे. तिकिटाचे शुल्क भरण्यासाठी स्मार्टकार्ड तसेच यूपीआयद्वारे डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे रोख रक्कम जवळ बाळगण्याची आवश्यकता नसून काही क्षणांत व्यवहार पूर्ण करून तिकीट मिळवता येणार आहे. यंत्राची कार्यप्रणाली सुटसुटीत असून स्क्रीनवरील पर्यायांच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे. विशेषतः गर्दीच्या काळात तिकीट खिडक्यांवरील अतिरिक्त भार कमी करण्यास या यंत्रणेची मदत होणार आहे. परिणामी स्थानकातील गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येण्याबरोबरच प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.
रत्नागिरी रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या या आधुनिक सुविधेचा प्रवाशांनी अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


