(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील मिरकरवाडा पठाणवाडी येथे राहणाऱ्या एका ३८ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा आकडीचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. मृत्यू झालेला कामगार झारखंडमधील असून काही दिवसांपासून अस्थम्याच्या त्रासाने त्रस्त होता.
मृत व्यक्तीची ओळख संतोष बिजय कुमार (वय ३८, रा. चंडीचळ, सोनारचळ, पत्थरगामा, जि. गोड्डा, झारखंड, सध्या रा. मिरकरवाडा पठाणवाडी, रत्नागिरी) अशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष हा स्थानिक हेमंत रामचंद्र जाधव यांच्याकडे काम करत होता. त्याला दमा-अस्थम्याचा त्रास असल्याने तो आयुर्वेदिक औषध घेत असे. २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास त्याचा सहकारी किशोर कुमार हा त्याला उठविण्यासाठी गेला असता, संतोष हा आकडीचा झटका येऊन खाली पडलेला दिसला.
किशोर कुमारने तात्काळ जाधव यांना कळविले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संतोषला तातडीने रुग्णवाहिकेने रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या अचानक मृत्यूने परिसरातील कामगार वर्गामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.

